सकाळी घाईत कामावर निघालो, फलाटावर गाडी उभी होती,
गाडीत चक्क उभं राहायला मिळालं, अन गाडी वेळेवर निघाली होती।
मला वाटलं की स्वप्नच बघत होतो
म्हणून मी चिमटा काढला तर जागाच होतो....
एकदा एका कामासाठी सरकारी कार्यालयात गेलो
तर सारे कर्मचारी कामावर हजर होते,
विशेष म्हणजे सारे आपल्या जागेवर होते.
कुणीही वर्तमानपत्र वाचत नव्हते की गप्पा मारत नव्हते.
निपुटपणे काम करत, दस्तऐवज पुढे सरकवत होते.
मी मनात म्हणालो चला,आता कुणाची कामं रखडणार नाहीत.
मला वाटलं की स्वप्न बघत होतो म्हणून मी चिमटा काढला...
वेळ वाचला होता.. म्हणालो एखादा सिनेमा बघूया ,
सिनेमातल्या नटाने अन नटिने अंगभर कपडे घातले होते,
तरीपण त्यात दोघेही सुंदर दिसले होते.
सिनेमा जरी हिंदी होता तरी चांगली पकड घेत होता,
थोडीशी हाणामारी होती पण नट शिवी देत नव्हता.
एक चांगला सिनेमा पाहिल्याचा आनंद झाला.
मी मनात म्हणालो असा सिनेमा पाहून मुलं बिघडणार नाहीत.
मला वाटलं की स्वप्न बघत होतो म्हणून मी चिमटा काढला.....
नंतर चुकून विधानभवनात गेलो बघतो तर काय,
सारे मंत्री शांतपणे विचारविनिमय करत बसले होते,
जनकल्याणासाठी जणू त्यांनी हातपाय कसले होते.
एवढ्यात मुख्यमंत्री आले आणी म्हणाले,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भाववाढ, गरीबी.. .... ..
.. यावर तोडगा काढला आहे ,
भ्रष्टाचार आणी लाचखोरी यांचा नायनाट आत्ता होणार आहे.
मी मनात म्हणालो बहुतेक भारत महासत्ता होणार आहे.
मला वाटलं की स्वप्न बघत होतो म्हणून मी चिमटा काढला...पण
एवढ्यांत गाडीत शेजारचा म्हणाला,
अरे ए....भाय.. एवढ्या गर्दीत उभ्याउभ्या झोपतोस काय ?
झोपतो ते झोपतो आणखी वर चिमटे पण काढतो ?
No comments:
Post a Comment