Showing posts with label Marathi Kavita. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita. Show all posts

Saturday, February 27, 2016

आताशा असे हे मला काय होते

आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातुन ज्या रोज जातो मुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा
न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे न अनुमान काही
कशी हि अवस्था कुणाला कळावी
कुणाला पुसावी कुणी उत्तरावे
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे
गीतकार : संदीप खरे, गायक : संदीप खरे - सलील कुळकर्णी
https://www.youtube.com/watch?v=9MIkW0vnV2I

Friday, February 19, 2016

अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

आजही पाकिटात कधीतरी दडवलेली
जुनी शंभरची नोट सापडली आणि
मनापासुन आनंद झाला तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

भर पावसात बाईक थांबवून
रस्त्याशेजारच्या टपरीवरच्या गरमागरम
भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

जुने, साधेसुधे शाळकरी मित्र
भेटल्यावर, त्यांना पूर्वीसारखी
कडकडून मिठी माराविशी वाटली
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

साबणाची वडी चपटी होईपर्यंत
वापरता आली, टूथपेस्ट अजूनही
शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

आईने किसलेल्या खोबर्याचा आणि
शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा
भरता आला तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून
घेतलेल्या बाईकचं,
घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं ,
आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या
पाचशेच्या साडीचं...
मनापासुन
कौतुक करता आलं की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

चाळीतल्या दिवसांच्या,
विटीदांडूच्या-लगोरी-गोट्यांच्या
खेळांच्या आठवणीत मन रमू शकलं
तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

मुलीला बार्बी खरेदी करताना,
घराशेजारच्या बांधकामावर आईबाप
काम करत असलेल्या तिच्या
समवयस्क छोटीसाठीही एखादं खेळणं
आठवणीने खरेदी केलत तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

इटालियन-मॅक्सिकन फुड खाताना,
बाबांच्या कमी पगारांच्या दिवसांतली
पोळीभाजी आठवली तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

नवं समृद्ध आयुष्य जगताना, जुने कष्ट आठवले,
ज्यांनी आयुष्य घडवलं ती
मंडळी नुसती आठवली,
तरी समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत....

Monday, November 30, 2015

रंग पाण्याचे

मराठी भाषेची सुंदरता
👌
रंग पाण्याचे

'पाणी'शब्द हा असे प्रवाही
वळवू तिकडे वळतो हा
जशी भावना मनात असते
रूप बदलते कसे पहा

नयनामध्ये येते'पाणी'
अश्रू तयाला म्हणती
कधी सुखाचे,दुःखाचे कधी
अशी तयांची महती

चटकदार तो पदार्थ दिसता
तोंडाला या'पाणी'सुटते
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी
म्हणती अविरत 'पाणी'भरते
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी 'पाणी'जाते

वळणाचे 'पाणी' वळणावरती
म्हण मराठी एक असे
बारा गांवचे 'पाणी' प्याला
चतुराई यातूनी दिसे

लाथ मारूनी'पाणी'काढणे
लक्षण हे तर कर्तृत्वाचे
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो
'पाण्या'त पाहणे गुण खोटा
'पाणी'दार ते नेत्र सांगती
विद्वत्तेचा गुण मोठा

शिवरायांनी कितीक वेळा
शत्रूला त्या 'पाणी'पाजले
नामोहरम करून अपुले
मराठमोळे 'पाणी'दाविले

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी'पानावरती
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे
अळवावरचे अलगद 'पाणी'

कळी कोवळी कुणी कुस्करी
काळजाचे'पाणी'होते
ओंजळीतूनी 'पाणी'सुटता
कन्यादान...पुण्य लाभते

मायबाप हे आम्हां घडविती
रक्ताचे ते 'पाणी'करूनी
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडते 'पाणी'
तुडुंब,दुथडी नद्या वाहती
दुष्काळाचे सावट पडतां
सारे'पाणी..पाणी'करती

अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची
पितरांना मग 'पाणी' देऊन
स्मृती जागते आप्तांची

मनामनांतील भावनांचे
'पाण्या'मध्ये मिसळा रंग
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा
चेहर्या‍वरती उठे तरंग

Monday, October 19, 2015

साडीचा "पदर" !
काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्‍व सामावलेलं आहे
त्यात!
किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर?
साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !
या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.
सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये
चर्चाही तीच.
लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.
जरा मोठं झालं, वरण-भात
खाऊ लागलं, की त्याचं
तोंड पुसायला आई पटकन
तिचा पदरच पुढं करते.
मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं
चालताना आईच्या पदराचाच
आधार लागतो. एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला,
की टॉवेलऐवजी आईचा
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही
त्याला...
बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.
महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो;
तर गुजरात, मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून पुढं
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !
काही कुटुंबात मोठ्या
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !
सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं
वाण लुटायचं ते पदर लावूनच.
बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच
डोक्‍यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते!
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबत
बांधली जाते.
पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना?
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण
कामाचा धबडगा दिसला,
की पदर खोचून कामाला
लागते.
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘
मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्‌
काय म्हणते अगं, चालताना
तू पडलीस तरी चालेल.
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.
या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.
पदर सुटला म्हटले, की
फजिती झाली; कुणी पदर
ओढला म्हटलं, की छेड
काढली.
"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.
असा हा किमयागार साडीचा पदर आजकाल जिन्सच्या जमान्यात लुप्त होत चालला आहे . नाहीतर पुढील पिढीला त्याचा अर्थ सांगायला तुम्हाला आम्हाला नक्कीच डिक्शनरी काढावी लागणार हे देखील एक कटू सत्य आहे

Friday, October 09, 2015

Monday, October 05, 2015

आजीबाईचा बटवा

खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा
मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा ||1||
लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद
लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||2||
कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा
केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा ||3||
सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||4||
उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद ||5||
बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||6||
पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी ||7||
केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद
केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||8||
गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर ||9||
अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||10||
पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा
पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा ||11||
वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?
खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||12||
संगणकावर काम करून थकली आहे का नजर
डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर ||13||
लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||14||
धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस ||15||
छोटे छोटे आजार बरे करा घरच्या घरीच हटवा
प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||16||

Tuesday, September 29, 2015

मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे

ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले,
त्यांनी दोन गाणी द्यावीत ll१ ll

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते,
त्यांनी थोडा उजेड द्यावा
युगायुगांचा अंधार जेथे,
पहाटेचा गाव न्यावा ll २ll

ज्यांच्या अंगणी ढग झुकले,
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी,
रिते करुन भरुन घ्यावे ll ३ll

आभाळाएवढी ज्यांची उंची,
त्यांनी थोडेसे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे ll ४ ll

- गणेश (दत्ता) तात्याराव हलसगीकर

Friday, June 19, 2015

चहा…! की Daru…!!

मला हे comparison आवडले.
चहा…! की Daru…!!

चहा म्हणजे उत्साह..,
Daru म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..,
Daru म्हणजे प्रेम..!!

चहा एकदम झटपट..,
Daru अक्षरशः निवांत...!

चहा म्हणजे झकास..,
Daru म्हणजे वाह मस्त...!!

चहा म्हणजे कथासंग्रह...,
Daru म्हणजे कादंबरी...!

चहा नेहमी मंद दुपार नंतर...,
Daru एक धुंद संध्याकाळी...!!

चहा चिंब भिजल्यावर...,
Daru ढग दाटुन आल्यावर...!

चहा = discussion..,
Daru = conversation...!!

चहा = living room....,
Daru = waiting room...!

चहा म्हणजे उस्फूर्तता...,
Daru म्हणजे उत्कटता...!!

चहा = धडपडीचे दिवस...
Daru = धडधडीचे दिवस!...!

चहा वर्तमानात दमल्यावर...,
Daru भूतकाळात रमल्यावर...!!

चहा पिताना भविष्य रंगवायचे...,
Daru पिताना स्वप्न रंगवायची...!!!

Tuesday, May 26, 2015

मौन

मौन

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.

– मुक्तायन, कुसुमाग्रज

Wednesday, May 20, 2015

एकांत माझा

एकांत माझा

हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा.

हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा?
हळूच रे मुक्याने भंगला एकांत माझा.

तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता
तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा.

अखेर भेटला नाहीस एकांती मला तू,
तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा.

दुरून आज मजला हाक आली ओळखीची,
चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा.

– सुरेश भट

Tuesday, May 19, 2015

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती सार्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची, अनओळखीची जाणीव गूढ आहे त्यास

धूप कपूर उदाबात्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले एक तन एक मन
खास-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली

वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात काल पटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा!

-शांता शेळके

Tuesday, March 24, 2015

बाबा रिटायर होतोय

बाबा रिटायर होतोय

बाबा रिटायर होतोय
आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.

आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,
"मी आता रिटायर होतोय,
मला आता नवीन कपडे नको,
जे असेल ते मी जेवीन,
जे असेल ते मी खाईन,
जसा ठेवाल तसा राहीन."

काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं,
काळीजच तुटावं, अगदी तसं झालं.

एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.
का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही,
"काय हवं ते करा माझी तब्बेत बरी नाही,
मला कामावर जायला जमणार नाही."

खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा,
पण तो काकुळतीला का आला?

ह्या विचारातच माझं मनं खचलं.
नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार,
आणि त्याने वाढत होता तो विसंवाद,

आई जवळची वाटत होती,
पण बाबाशी दुरावा साठत होता.
मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं,
पण ते शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल,
पण दिसण्यात आलं नाही.

मला लहानाचा मोठा करणारा बाबा,
स्वःताच स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा - शिकवणारा बाबा,
का कुणास ठाऊक बोलताना धजत होता.

मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला,
शरीर साथ देत नव्हतं,
हे त्या शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला,
घरात नुसतं बसू देत नव्हतं.हे मी नेमकं ओळखलं.
खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,
सांगायचच होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण
आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ आता”.

लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं
वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो,
तेव्हा वाटतं कि काही जणू आभाळंच खाली झुकलं.

आज माझंच मला कळून चुकलं.
— I love my dad

Friday, January 16, 2015

एक कप वाफाळता चहा..अहाहा..

एक कप वाफाळता चहा..अहाहा..
एक कप चहा वाफाळता

थीजलेल्या मनास करी तरल
मनाभोवतीचे हिम विरघळेल
मन मोकळे बोलता येइल
मनातील सल बोच जाईल

एक कप वाफाळता चहा
पिऊन तर पहा.. अहाहा..

मेंदुवरील जळमटे हटतील
भोवतालचे कवच तुटेल
तेथे संवेदना पोचतील
आपल्यात संवाद साधेल

एक कप वाफाळता चहा
पिऊन तर पहा.. अहाहा..

जडावलेलि जीभ नरम होईल
शब्द एकेक बाहेर येतील
ह्रुदय जरा मोकळे होईल
कढ तेव्हढाच कमी होईल

एक कप वाफाळता चहा
पिऊन तर पहा.. अहाहा..

बाहेर कडक ऊन जरी असले
कडक ऊन्हाचे चटके जरी बसले
एक कप वाफाळता चहा घेशील
क्लान्त चेहरा टवटवीत दिसेल

एक कप वाफाळता चहा
पिऊन तर पहा.. अहाहा..

मन हे कसे ते शान्त होते
वादळ ते शमलेसे वाटते
वाफ़ जणु डोळ्यात जमते
म्हणुन मी निवलेला चहा घेते
एक कप चहा वाफाळता..

रजनी अरणकल्ले..

Thursday, December 18, 2014

एकांत...

एकांत...
एकटेपण बोचतं, असे सारेच म्हणतात.
एकटेपण मला सुखावत,
म्हणून सारे वेडयात काढतात.
त्यांना काय कळणार?
एकटेपणात मनाने दिलेली साथ
त्याच्याच सल्ल्यानुसार मी केलेली प्रसंगावर मात,
त्यांना कस उमजणार?
एकटेपणात मन माझं बोलत,
माझ्या सारया वेदनांवर हळुवार फुंकर घालत!!!

Wednesday, December 03, 2014

|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

आज पहाटे जाग येता
डोळे अर्धे निजलेले
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले

बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा
रवीकिरणांना शोधित शोधित उधळीत जाई पर्णपिसारा

मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल

|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||