Showing posts with label Paus. Show all posts
Showing posts with label Paus. Show all posts

Thursday, June 30, 2016

आणि कमी आहे फक्त तुझी



मुसळधार कोसळणारा पाऊस
सोबत दर्द रफीजींच्या आवाजातला
आणि कमी आहे फक्त तुझी

रिमझिम बरसणाऱ्या निवांत धारा
खमंग भजी चहा बशीतला
आणि कमी आहे फक्त तुझी


कडाडणाऱ्या विजा सोसाट्याचा वारा
समोर तरळणारा प्रसंग आठवणीतला
आणि कमी आहे फक्त तुझी

छतावरून गळणारे टप टप थेंब
ओघळणारा कण कण माझ्या डोळ्यातला
आणि कमी आहे फक्त तुझी

प्रज्ञा रायकर जोशी

Monday, June 13, 2016

रिमझिमत्या सरी

रिमझिमत्या सरी आठवणी होऊन
वाहायला लागतात..
जरा कुठे त्याची चाहूल काय लागते,
लगेच कविताच सुचायला लागतात..!!!
- स्पृहा

Friday, July 10, 2015

हा पाऊस आणि तुझी आठवण

हा पाऊस आणि तुझी आठवण
 दोन्ही आडवता येत नाही 
पण त्याना आडवायचं
 का हा प्रश्न मनाला सोडवता येत नाही.
~ चंद्रशेखर गोखले 

Tuesday, July 07, 2015

सरीवर सर ....

सरीवर सर ....

दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....

तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल ! उतू गेले मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर .... सरीवर सर ....

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल .... गेले जल .... झाले जल आरपार
सरीवर सर .... सरीवर सर ....

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

संदीप खरे

Wednesday, July 01, 2015

पून्हा पावसाचे दिवस...

पून्हा पावसाचे दिवस अन पून्हा तुझं तसच
वागणं....
खिडकी लाऊन घेताना तिरप्या नजरेनं
बघणं ....
-चंद्रशेखर गोखले

Thursday, June 25, 2015

रूप सदाफुलीचे

रूप सदाफुलीचे पाहुनी थेंब पावसाचे भूलले,
पाकळ्यांना हळुवार स्पर्श करीत न्याहाळत ते बरसले,
थेंबांच्या त्या गार स्पर्शाने रोमांच सदाफुलीच्या अंगी उठले,
मोत्यांच्या क्षणिक सहवासात रूप सदाफुलीचे अधिकच खुलले.

Wednesday, June 24, 2015

वयाचे दाखले द्यायला
आपण पावसाळे मोजतो
पण खरं सांगा त्यात आपण
कितिसे भिजतो?
~ चंद्रशेखर गोखले

गोष्ट वेड्या पावसाची

गोष्ट वेड्या पावसाची

नाही राजा-राणीची
नाही मांजर-मनीची
ऐका सांगते तुम्हा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची

मेघांतून एकटाच आपुला
पाऊस रोज फिरत असे
कुणीच नाही खेळायला
हेच त्याचं दुःख असे

पळावया हे अथांग आकाश
पण पकडायला कुणीच नसे
गगनाच्या या अफाट जगात
जो तो आपुला मग्न असे

अशाच एका सायंकाळी
ठरविले त्या पावसाने
अंबरी नाही कुणीच सोबती
जाईन म्हणतो धरतीकडे

अंगावर काळा कोट घालून
ऐटीत तो तयार झाला
ढगांच्या रथात स्वार होऊन
दौडत दौडत पृथ्वीवर निघाला

पृथ्वीवर आगमन होताच त्याने
नद्या-सागरांना मिठी मारली
शेतात पिकांबरोबर डोलताना
हास्याची गोड कळी खुलली

फुले हसली, पाने डोलली
निर्झर खळखळून धावू लागले
या डोंगरावरून त्या डोंगरावर
पावसाचे खेळ सुरूच राहिले

असा हा खुळा पाऊस
मनसोक्त खेळून गेला
जाता जाता धरतीचेही
मन तृप्त करून गेला

अशीच झाली होती मैत्री
या पावसाची धरतीशी
कशी वाटली सांगा गड्यांनो
गोष्ट वेड्या पावसाची

~सुप्रिया गावडे, डोंबिवली

Monday, June 22, 2015

शाळा.. आणि पावसाळा..

शाळा.. आणि पावसाळा..
दोघ आसपास एकत्रच शुरु व्हायचे..
नविन रेनकोट, रंगित छत्रि घेउन शाळेत जाताना कितिहि हुशार असले, तरी साले सगळेच मित्र वेडे वाटायचे..

रस्त्यावरच पाण्याच डबकं मस्ती करायचा एक बहाणाच वाटायचा.. गमबूटचा उपयोग चालण्यासाठि कमी, पाणी भरून मस्ती करण्यासाठि जास्त व्हायचा..
लहानपणीची शाळा पावसाळा खुप छान होतं..
आता सगळे मोठे झाले, पैशाच्या पावसात पाण्याच्या पावसातली मैत्री वाहुन गेली..
पण पाऊस अजून पडतो आहे, फक्त माझा प्रत्येक मित्र एकटा भिजतो आहे...

भिजून गेला वारा...

भिजून गेला वारा...

भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना जरा

झिम्माड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले
श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतूर झाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना जरा

स्पर्शात वारे, निळे पिसारे, आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघांत जग हे न्हाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिटून डोळे घे ना जरा

Friday, June 19, 2015

मन आणि आभाळ

मनाचं आणि आभाळच
काहीतरी नातं असावं !
नाहीतर आभाळ भरून आल्यावर
मनही का दाटून यावं ?
-शरद

Wednesday, April 01, 2015

मागू नकोस

मागू नकोस

मागू नकोस रे तू
आपण जगलेले ते बेभान क्षण
जरा कुरवाळू दे ना मला
ती विलक्षण आठवण

धुंद पावसातली ती
ओली गच्च संध्याकाळ
एकाच छत्रीतून केलेली
ती नशीली वाटचाल

त्या मुसळधार पावसाच्या
बेफाम सरी
अन तुझ्या सहवासाची
ती गोड शिरशिरी

सारं कसं भारलेलं
मंत्रमुग्ध झालेलं
मौनानंच जणू
सारं काही बोललेलं

माझ्या मनात कायमचा
साठवू दे रे तुला
दृष्टीआड होण्या आधी
सारं पुन्हा जगू दे रे मला

-जयश्री अंबासकर

Friday, July 11, 2014

पाउस

पाउस

पाउस कोसळतो छपरावरती
त्यावरुन सांडती हजारो मोती
काही माझ्या गाली पडती
काही करती गंधित माती

पाउस कसा हा
अल्लड खेळातो
कधी पानांतून
तर कधी मनातून झरतो

मनातील गाणे
पाउस जाणतो
अबोल शब्दांना तो
सुर लावतो

मन माझे एकाकी
पाउस त्याला वेड लावतो
नाही कुणी येणारे जरी
उगा मिलनाची ओढ लावतो

थोडा खुलवतो
थोडा झुलवतो
आकांक्षांना तो पंख लावतो
ओंजळीत साठलेल्या तळ्याकाठी
स्वप्नांचे तो गाव बांधतो

पाउस येतो
पाउस जातो
मनाचे रितेपण तसेच राहते
आंतरिच्या अश्रुंमधुन
पावसाचेच गाणे उमटते

---- प्रसाद कोलते

Thursday, July 03, 2014

आलो आहे आता मी....

आलो आहे आता मी....

आलो आहे आता मी
मनसोक्त भिजून घे
पुन्हा लिही कविता माझ्यावर
हातात ती लेखणी घे


कोसळत्या सरींबरोबर
भाजक्या मक्याचा आस्वाद घे
छत्री दे भिरकावून
अन् हवं तेवढं बागडून घे

चिखलातून चालताना
पँट थोडी सावरून घे
घरी पोहोचायला उशीर होईल
रेल्वेचं कोलमडणं सांभाळून घे

गॅलरित बस निवांत
काॅफी आणि कांदाभजी घे
वाफांचं आणि सरींचं काँबिनेशन
समजत असेल तर समजून घे

असेल नसेल कोणी सोबत
तर त्यांनाही सामावून घे
भिजण्याची आवड नसेल
पण थोडं ईतरासाठी भिजून घे

छप्पर गळेल घराचं
ताडपत्रीवर तोंडसुख घे
माझ्या कोसळण्याचे बोल
मलाच लावण्याचंही सुख घे

पुन्हा मी निघून जाईन
हवं तेवढं ओंजळीत भरून घे
वर्षभर साठवून ठेवायचंय तूला
आज मात्र थोड्यावरंच भागवून घे