Showing posts with label Priyasi. Show all posts
Showing posts with label Priyasi. Show all posts

Wednesday, June 22, 2016

सांजेच्या काठावरती

सांजेच्या काठावरती
अलवार क्षणांच्या भेटी
ही प्रीत आपली आहे
की शतजन्मांच्या गाठी...
कोणती तपस्या केली
ज्याने तू माझी झाली
आयुष्य घेतले माझे
थरथरत्या पदराखाली...
एकांत भावतो मजला
जो तुझी आठवण देतो
हा तुझ्या दिशेचा वारा
येतो अंगास बिलगतो...
एवढा दुरावा असुनी
भेटतो मनाने आपण
मग कायेवरती चढते
नाजुक स्पर्शांचे लेपण..
बोटाने नाव गिरवतो
वाळुत मुलायम ओल्या 
तू दिसते नावामध्ये
मन कातर झाल्या झाल्या...
ओंजळीस आयुष्याच्या
तू ओंजळ लाव तुझीही
पेटता दिवा प्रेमाचा
नाही विझणार कधीही...
-- संतोष

Friday, June 10, 2016

तुला म्हणून सांगते ....

तुला म्हणून सांगते .....

पुन्हा पुन्हा शहारते, तुला म्हणून सांगते,
मिठीत वेड वाढते, तुला म्हणून सांगते .....

जिथे जिथे खुणा तुझ्या, वसंत पेरतो सख्या,
तिथेच मी विसावते, तुला म्हणून सांगते......

तुझी प्रिया तुझ्यासवे, नभात झेप घ्यावया,
गगनझुलाच मागते, तुला म्हणून सांगते ....

नजर कधी न लागण्या, तुला कुण्या सुरंगिची,
इथून दृष्ट काढते, तुला म्हणून सांगते.....

तुझे अबोल राहणे, दिशात शून्य पाहणे,
क्षणात मौन वाचते, तुला म्हणून सांगते....

धुक्यास पांघरून मी, तनामनास जाळते,
दवात रात जागते, तुला म्हणून सांगते......

तुझ्याच आरशातला, चुकार चेहरा पुन्हा,
नव्या ऋतूत पाहते, तुला म्हणून सांगते ......

माधुरी

Monday, February 01, 2016

तुझ्या सोबत

तु समोर असलीस की 
नुसतच तुला बघण होत 
आणि तू जवळ नसतांना 
तुझ्या सोबत जगण होत 
~ चंद्रशेखर गोखले


Friday, January 29, 2016

तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे. .

तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे. .
उन्हे गात होती जरी त्याक्षणी
तश्यातच मला भेटलेली कुणी 
जरा सावळीशी तनू लाजरी
किती बोलली फक्त नजरेतुनी…
तिचे पास येणे जरी थोडके
जसे सोबती अंतराचे धुके
असा हरवलो त्या क्षणातून मी
तिला पाहतानाच स्पंदन चुके…
तिचा हाती हाती तरी घेतला
खुळा स्पर्श झाला शहा-यातला
उन्हे पेटली भर दुपारी तरी,
इथे मात्र हा गारवा वाढला...
तशी वेळ ती फक्त दोघातली
म्हणूनच मिठीला मिठी मारली
तिच्या बाहुपाशी असा गुंतलो
जणू गाठ रेशिम कुणी बांधली…
फुले श्वास, रोमांच देहावरी
तरी सोडवेना मिठी भरजरी
जरी या क्षणा आठवू पाहतो
तरी आठवे ती मला लाजरी...
खुले केस पाठीवरी सोडूनी
मला भासली ती जणू कामिनी
तिच्या धुंद गंधात गंधाळता
इथे दरवळे भेट हृदयातुनी. .
अधर स्पर्शता लाजली बावरी
"नको ना, नको ना" उगी बोलली
तिचे लाजणे जीवघेणे असे
नकारातही हाय ती हासली. . .
किती शांत एकांत द्यावा तिने
जिच्या सोबती मोहरावी क्षणे
अता फक्त आठव मला यायचे
तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे…
पूजा भडांगे

Thursday, January 28, 2016

स्पर्श


स्पर्श
हुबेहूब हे चित्र तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
ओठ गुलाबी, गहिरे डोळे
त्यांत परी ना तूच कुठे!
हुबेहूब हे शिल्प तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
हसरा चेहरा, सुडौल बांधा
त्यांत परी ना तूच कुठे!
घेता हात हातांत तुझा मी
कळले मज ते काय उणे
हुबेहूब हे चित्र, शिल्प तरी
स्पर्श, गंध त्यां तुझा कुठे?
निरभ्र आकाश, झरे खळाळते
चंद्र तूच अन तूच चांदणे
उमलते फुल, तान मधुर
पहाट तूच अन तूच धुके
आकाश, धुके हे चंद्र, चांदणे
फुल, तान जरी रूप तुझे
पहाट धुक्यापरी सर्व हि खोटे
कारण.........
स्पर्श, गंध त्यां तुझा कुठे?
- केदार

Wednesday, January 27, 2016

पाहीलं मी तुला

पाहीलं मी तुला

पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना
ते नाते अनामिक तु अनावर जपताना ।।

पाहीलं मी तुला
तु एकांतात असताना, माझ्यासाठी झुरताना,
तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुला माझं चित्र पाहताना
ओढ्याकिनारी फुलपाखरांशी गप्पा मारताना
माझे प्रतिबिंब समजून तूला स्वतःशीच बोलताना
पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना ।।

पाहीलं मी तुला
खळखळून हसताना, भरभरून जगताना
माझ्या दुःखाला कवटाळून तुला मुसमुसून रडताना,
तू नशिबाशी लढताना प्रत्येक वेळी जिंकताना,
प्रेमासाठी माझ्या मात्र तुला वेळोवेळी हरताना
पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना ।।

- माहीराज


Wednesday, December 23, 2015

सुंदर खळी

कधी खट्याळ हसताना तु,
गालावर सुंदर खळी
पडायची…
अन् पडलेल्या त्या खळीमुळे,
तु अजून सुंदर दिसायची…

Monday, December 14, 2015

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
एका अबोल सांजवेळेत रमणारी
आयुष्यातले रंग मुक्त उधळीत
मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवचित मला एकाकी गाठणारी
आवेगाच्या धुक्यात मला लपेटून
भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवखळ अल्लड सरींनी सजणारी
सारा आसमंत भिजवून जाताना
पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी
लाख अडवून धरले तरी
निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण

-एक एकटा एकटाच

Tuesday, December 01, 2015

तू असतीस तर

तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे

बकुळिच्या पुष्पांपरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन्‌ रंगांनी भरले असते
क्षितिजावरले खिन्‍न रितेपण

पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदुश्यामल मखमल
अन्‌ शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसून मिष्किल

तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धूसर अंतर

मंगेश पाडगावकर

Thursday, November 19, 2015

मी माझी रे! उरले नाही

मी माझी रे! उरले नाही

खोल कपारीमधील काळिज
कधी चोरले? कळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

विरहदाह मी शांत कराया
शीतल चांदण फुले माळली
स्वप्न बघू तर कसे बघू मी?
डोळ्यामध्ये प्रीत जागली
चंद्र भाळला! तुला सोडुनी
चित्त कुठेही रमले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

मेघ सावळा गेला भिजवुन
शहारलेले अंग मखमली
तरी पेटली यौवन काया
भाव मनी दाटले मलमली
बांध नको! मी नदी असोनी
अधी कधी खळखळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

स्वप्न रुपेरी नेत्री माझ्या
रंगवले अन् हरवलास तू
असे वाटते स्पंदनातुनी
माझ्यासंगे बहरलास तू
वादळातही निरव शांतता
पान एक सळसळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

काय हवे वेगळे याहुनी?
श्वास मिसळले तुझे नि माझे
मुक्त छंद क्षितिजावर गाऊ
विषय सुखाचे कशास ओझे?
चिरंजीव ही पहाट अपुली
इथे कधी मावळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, November 11, 2015

तू गेल्यावर वाटतं
खूपसं सांगायचं होतं,
तू खूपसं दिलंस तरी
आणखीन मागायचं होतं..
चंद्रशेखरजी गोखले

Wednesday, November 04, 2015

तुझी गहरी नजर

तुझ्याकडे येणारं
एक एक पाउल
मी खूप आशेने टाकायचो ...
तू गहिऱ्या नजरेने
बघायचीस मला
अन मी तिथेच
खिळून राहायचो ...

Wednesday, October 28, 2015

तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या गालावरच्या खळीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या ओठावरच्या स्मित हास्याने
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या काळ्या कुंतल केसांनी
मज वेड कसे लाविले
तुझ्या भुरभुरणार्या बटांनी
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या झुळझुळीत गुलाबी साडीने
मज वेड कसे लाविले
वार्यासंगे फडफडणार्या पदराने
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या ठुमकत मुरडत चालीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या थिरकत्या पैंजणानी
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या घायाळ करत्या नजरेने
मज वेड कसे लाविले
तुझ्या धुंद अशा मिठीने
तुझे प्रेम मजला सांगितले

सौ मनिषा पटवर्धन

Tuesday, August 25, 2015

तुज बघता सारा हिशेब चुकला होता

"तुझ्यावरच्या कविता" मधील एक अप्रतिम रचना

तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता

तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता

तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता

डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता

निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता

तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता

पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता

चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता

संदीप खरे

Wednesday, August 05, 2015

भेट

प्रिय,
तू म्हणालीस
सारखं सारखं नको भेटायला,
उगाच सवय लागायची…
पण भेटत जाऊ आपण
नाहीतर उगाच सवय लागायची,
न भेटण्याची …
~ मिलिंद जोशी 

Monday, July 20, 2015

आपण प्रथम भेटलो तेथे

आपण प्रथम भेटलो तेथे
मन माझं पुन्हा पुन्हा फिरून जातं
सा-या खुणा तशाच असतात
तुझं असणं मात्र बाकी रहातं ...