आंबेडकर उरले फोटोपुरते
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमी प्रमाणेच उत्साहात साजरी होत आहे. भारतात सर्वच महापुरूषांबाबत हे घडते. याला बाबासाहेब तरी कसे अपवाद ठरणार?
आज सर्वच पक्षाचे नेते आंबेडकरांची थोरवी सांगणारी भाषणे करतील. खरे म्हणजे आंबेडकर इतके मोठे होते की ते किती महान होते हे आता नव्याने सांगण्याची गरजच नाही. पण आपल्या नेत्यांना भाषणे ठोकण्याची सवय जडली आहे. कोणाची जयंती, पुण्यातिथी असली की हे नेते माइक हातात येण्याची वाट बघत असतात. आज अशा मंडळींना आंबेडकर मिळाले आहेत.
महामानवाचे स्मरण कसे करायचे? त्याचे पुतळे उभारा,, रस्त्याला नावे द्या, गल्लीबोळात त्याचे अर्धपुतळे बांधा. विमानतळ, रेल्वे स्थानके यांनाही आता मोठ्यांची नावे द्यायची पद्धत आली आहे. हारतुरे चढवा. काही ठिकाणी तर एकदोन पुतळे उभारून होत नाही. डझनाच्या संख्येत पुतळे उभारले जातात. इतके पुरेसे वाटत नाही म्हणून उद्याने, बगीचे यांचेही नामांतर करा भले मग आंबेडकरी जनता उपाशीतापशी रहात असो. सवर्ण त्यांना वाइट वागणूक देत असोत. या वर्गात शिक्षणाचा अभाव असो.
आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. अत्यंत कष्टाने ते शिकले होते. शिक्षणाशिवाय तराणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. शिक्षणसंस्था काढण्यामागे त्यांचा मुख्य उद्देश होता की दलित मुलांनी शिकावे, मोठे व्हावे. संघर्ष करा असे त्यांनी सांगितले होते. पण दलित नेत्यांनी हा उपदेश बाजूला ठेवला. स्वहित आणि त्यासाठी प्रमुख राजकीय नेत्यांशी जुळवून पदे मिळवणे इतकाच मर्यादित कार्यक्रत त्यांनी ठेवला.
काही वर्षापूवीर्पर्यंत वडापाव खाऊन चळवळीत उतरणारे आज काही कोटींचे मालक कसे झाले हे दलित जनतेला उमगत नाही. आपल्याकडे मते मागयला येणारे आपले नेते नंतर दिसत का नाहीत हे त्यांना कळत नाही. यापैकी एकाही नेत्याला चांगली शिक्षणसंस्था काढून दलित मुलांची सोय करावी असे वाटत नाही. आंबेडकरी जनता इतकी पिचलेली आहे की, या नेत्यांना जाब विचारण्याची ताकद त्यांच्यात नाही. इतकी अज्ञानी आहे की ती या नेत्यांमागे फरफटली जात आहे. या समाजाचे नेतृत्व ज्यांनी करायला हवे ते वरची पदे मिळवण्यात मग्न आहेत.
यातून मार्ग कसा काढायचा या प्रश्नाचा विचार आंबेडकर जयंतीदिनी व्हायला हवा. दलितांचे नेतृत्व फक्त दलित नेत्यांनी करायचे असते हा भ्रम आधी काढून टाकायला हवा. दलित युवकांनी प्रस्थापित दलित नेत्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवायला हवे. मुख्य म्हणजे बाबासाहेबांचे नाव घेऊन स्वत:ची दुकाने चालवणाऱ्यांना निवडणुकीच्या माध्यमातून घरचा रस्ता दाखवायला हवा. असे झाले नाही तरी आंबेडकर जयंती आणि पुण्यातिथी येत राहील. दलित समाज आहे तेथेच राहील. नेते मात्र गब्बर होत जातील.
आंबेडकरांना वंदन करताना दलित समाजाने हा विचार करावा हीच अपेक्षा. नाहीतर कायम राखीव जागांसाठी झगडणारा, त्याचा फायदा उठवणारा अशीच समाजाची ओळख उरेल. तसे होणे यासारखे देशाचे दुदैर्व नाही. एक दिवस असा यायला हवा की, दलित तरुणांनी सांगावे की राखीव जागा आम्ह्ाला नकोत, आम्ही आमच्या हिंमतीवर आणि कर्तृत्वावर पुढे जाऊ.. आज आंबेडकर असते तर त्यांनी हेच सांगितले असते
सुहास फडके
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5800509.cms
No comments:
Post a Comment