Thursday, December 31, 2015

" सरणारे वर्ष मी "

" सरणारे वर्ष मी "
-----------

मी उद्या असणार नाही
असेल कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
चेहरे तुमचे हासरे

झाले असेल चांगले
किंवा काही वाईटही
मी माझे काम केले
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु
तुमची माझी नाळ आहे
भले होओ , बुरे होओ
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु
आणि दोषही नका देऊ
निरोप माझा घेताना
गेट पर्यन्त ही नका येऊ

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली

धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला
तुम्ही मला खुशाल विसरा
दोष माझा प्राक्तनाला

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही
मी माझे काम केले
बाकी दूसरे काही नाही

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणणार नाही
" वचन " हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो
" शुभ आशीष " देऊ द्या
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।

Wednesday, December 30, 2015

कवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र श्रद्धांजली....!

प्रेंम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच आणि आमचं अगदी सेम असतं
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वाटतात ?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे ,
फसल्या तर फसू दे .

तरीसुद्धा
तरीसुद्धा ,
प्रेंम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तूमच आणि आमचं अगदी सेम असतं .
मराठीतून "इश" म्हणून
प्रेम करता येत ,
उर्दूमध्ये "इश्क़ " म्हणून
प्रेम करता येत .
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येत .
Convent मध्ये शिकलात तरी
प्रेम करता येत
सोळा वर्ष सरली कि अंगात फुल फुलू लागतात .
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलु लागतात .
आठवत ना ?
तू मची माझी सोळा जेव्हा
सरली होती ,
होडी सगळी पाण्याने
भरली होती ?
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो .
होडी सकट बुडता बुडता
वाचलो होतो .
बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं ,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं .
तूम्हाला ते कळल होतं .
मला सुद्धा कळलं होतं !
कारण ,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तूमच आणि आमचं अगदी सेम असतं .
"प्रेमबीम झूठ असतं ",
म्हणणारी माणसं भेटतात .
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं,
म्हनणारी माणसं भेटतात !
असाच एक जन
चक्क मला म्हणाला ,
"आम्ही कधी बायकोला
फीरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधी सुद्धा केलं नाही !
आमचं काही नडला का ?
प्रेमाशिवाय अडला का ?
त्याला वाटलं मला पटल !
तेव्हा मी इतकाच म्हटलं :
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तूमच आणि आमचं मात्र सेम नसतं.
तीच्यासोबत पावसात कधी
भीजला असाल जोडीने !
एक chocolate अर्ध अर्ध
खाल्ला असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत
तासंतास फिरला असाल !
झंकारलेल्या सर्वस्वाने
तीच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं
डोळ्यानीच हसणं असतं ,
प्रेम कधी भांडतं सुद्धा !!
दोन ओळींची चिठी सुद्धा प्रेम असतं ,
घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं ,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!
-कविवर्य मंगेश पाडगावकर .
खुपच वाईट बातमी..! साहित्य जगतामधला महान तारा निखळला.....!
बाकीचे सगळे भास असतात,
सोबतीला अखेरपर्यंत
आपलेच फक्त श्वास असतात...!
कवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र श्रद्धांजली....!

Wednesday, December 23, 2015

सुंदर खळी

कधी खट्याळ हसताना तु,
गालावर सुंदर खळी
पडायची…
अन् पडलेल्या त्या खळीमुळे,
तु अजून सुंदर दिसायची…

Tuesday, December 22, 2015

मोबाईल शिवाय...

मोबाईल शिवाय...

बारा मोटेची विहीर

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे"शेरी लिंब"नावाचे गाव आहे,
या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.
शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.
ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.
साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.
अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.
विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.
या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.
या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.
या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.
विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.
अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.
या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.
इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.
गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.
खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.
या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.
सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.
इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...!

Thursday, December 17, 2015

आज चंपा षष्ठी

आज चंपा षष्ठी
जय मल्हार

गड जेजुरी जेजुरी
तिथे नांदतो मल्हारी
स्वयं महादेव देव
मार्तंड भैरव अवतारी

गड जेजुरी जेजुरी
गडाला नवलाख पायरी
उधळण भंडा-याची
भक्त भक्ती भावे करी

गड जेजुरी जेजुरी
चमकते सुवर्णनगरी
जयाद्री सखी गौरीची
म्हाळसा बनली गौरी

गड जेजुरी जेजुरी
राजधानी मल्हारगडावरी
मणिमल्ल दैत्य माजले
रिपुदमन करी मल्हारी

प्राची देशपांडे

Monday, December 14, 2015

Mitra... मित्र


तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
एका अबोल सांजवेळेत रमणारी
आयुष्यातले रंग मुक्त उधळीत
मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवचित मला एकाकी गाठणारी
आवेगाच्या धुक्यात मला लपेटून
भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवखळ अल्लड सरींनी सजणारी
सारा आसमंत भिजवून जाताना
पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी
लाख अडवून धरले तरी
निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण

-एक एकटा एकटाच

Tuesday, December 01, 2015

तू असतीस तर

तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे

बकुळिच्या पुष्पांपरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन्‌ रंगांनी भरले असते
क्षितिजावरले खिन्‍न रितेपण

पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदुश्यामल मखमल
अन्‌ शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसून मिष्किल

तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धूसर अंतर

मंगेश पाडगावकर