Tuesday, August 25, 2015

आता तरी बरस !!!

अरे काळ्याभोर ढगा !!!
बरस की रे आज!
ऑगष्ट जातोय उलटून
निदान बाळग थोडी लाज!
सृष्टीचाच नियम म्हणून
तुलाही घे लाच!
दोन पैसे जास्तीे घेऊन
मोरांसाठी नाच!!

त्याचा सुद्धा तुझ्यावर
विश्वास नाही राहिला!
फुलोरा करून पिसांचा
डिजेवर नाचू लागला !

काय तुझा पूर्वीचा तो
होता कसा थाट
चातकं सुद्धा तुझी आता
पहात नाही वाट

तहानलेला कावळा आता
गोष्टीं मध्येच राहीला,
वाट पाहून पाहून तुझी,
बिसलरी पिऊ लागला!!

मित्र घेऊन काळेकुट्ट
विजांसोबत गरज,
सवाल तुझ्या इमेजचा
आता तरी बरस !!!!
आता तरी बरस !!!

तुज बघता सारा हिशेब चुकला होता

"तुझ्यावरच्या कविता" मधील एक अप्रतिम रचना

तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता

तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता

तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता

डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता

निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता

तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता

पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता

चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता

संदीप खरे

Thursday, August 20, 2015

तु म्हणजे एक स्वप्न

तु म्हणजे एक स्वप्न,भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे,मनात दडुन ठेवलेले,
कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे

श्रावण

निळ्या नभातुन बरसेल श्रावण
उन-पावसाचा खेळ करेल श्रावण

तहानलेल्या या धरतीला
धुंद सरींचा घोट पाजेल श्रावण

तना-मनास चिंब भिजवेल श्रावण
शब्दांची धुंद-तार छेडेल श्रावण

मस्त हवेच्या मौसमाने
या मनास मुक्तछंद लावेल श्रावण

हर्ष-उल्हास देईल श्रावण
फ़ुलण्याची नवी आस होईल श्रावण

हिरव्या नवलाईच्या शालुने
आज या धरणीस सजवेल श्रावण

ह्रुदयातली आग विझवेल श्रावण
प्रेमळ सरींनी भिजवेल श्रावण

काल नयनातुन बरसणा-या
थेंबालाआज नभातुन बरसवेल श्रावण
श्रावणाच्या हार्दीक शुभेछ्चा.................

- सचिन काकडे

नातं

असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघांनाही सांगता येत नही …
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्दं मात्र ओठांत येत नाहीत …

Tuesday, August 11, 2015

कर्म सिद्धांत ...

कर्म सिद्धांत ...

आठवण - एक हृदयस्पर्शी कथा

आठवण - एक हृदयस्पर्शी कथा

तिने पुन्हा एकदा टेबलवरच्या डायरीमधला तो कागदाचा चिटोरा उचलला. परत त्यावरच्या नंबरवरून नजर फिरवली. पुन्हा टेबलवर ठेवलेल्या मोबाइलवर नजर खिळली, पुन्हा मन do or do not मध्ये अडकले. मनातल्या मनात पुन्हा येऊ शकणारे सगळे reactions तपासून पाहिले. नजर शून्यात लागलेली … आज सकाळ पासून हे असंच चाललंय तिचं …… घरातल्या कुठल्याही कामात मनंच लागत नव्हतं.

नाही ! मानेला हलकासा झटका देत तंद्रीतून बाहेर पडत ती पुटपुटली

पुन्हा चिटोरा डायरीच्याआत ढकलला आणि उठली जागेवरून. चिटोरा ठेवला तरी त्यावरचा नंबर मनात उचंबळ्या खात होता. मनात विचारांचा घोळ चालूच होता. ती किचनच्या ओट्याजवळ आली, हंड्यातून पाणी काढून प्याल्यात ओतले आणि प्याला ओठांना लावत घटाघटा प्यायली, ग्लास ओट्यावर ठेवत वळली अन ओट्याला टेकून तशीच उभी राहिली…. विचारांची तंद्री पुन्हा … किती वेळ तिलाही कळालंच नाही.

सात वर्ष निघून गेलीत, कॉलेजचा तो दिवस अजूनही तसाच डोळ्यासमोर उभा राहायचा तिच्या,

ती नौकरी करायची, गरजच तशी होती. वडील नसलेल्या तिला घर चालवण्यासाठी, लहान भावाच्या शिक्षणासाठी आईची मदत करणं गरजेचं होतं. पण शिक्षण सोडायचं नव्हतं. खूप शिकावं हा ध्यासच होता तिचा.

त्या दिवशी अशीच डोळ्यात पाणी घेऊन मुसमुसत कॉलेजच्या ऑफिस मधून बाहेर पडली आणि अक्षयशी नजरानजर झाली. …पहिल्यांदाच …
क्लासमेट म्हणून एकमेकांना ओळखत होते पण यापूर्वी कधीही ते एकमेकांशी बोलले नव्हते. आणि आत्ता तो पुढ्यात उभा राहून तिला न्याहाळत होता. तिच्या पडलेल्या चेहेऱ्यावर काहीतरी शोधू पाहत होता. ती नजर चोरून वळून जाऊ पाहत होती पण तो आणखीच तिच्या पुढे आला त्याच्या नजरेने तिचे अश्रू हेरले होते …

तो "थांब, काय झालं ??"
तिनं 'काही नाही' असा मानेनेच नकार दिला
तो " hello, tell me what happen ? कोणी काही बोललं का तुला ?"

त्याच्या या शब्दांनी तिचे डोळे अधिकच वाहू लागले….

" एग्झामचा फॉर्म भरायला नाही म्हणताहेत सर, माझी प्रेझेंटी कमी पडतेय"

तो " असं कसं म्हणताहेत ? तू चल माझ्यासोबत " असं बोलून त्यानं हात धरला तिचा आणि घेऊन गेला परत ऑफिसमध्ये

अक्षयच्या बोलण्यात जादू होती कि सांगण्याची पद्धत तशी वेगळी कळालं नाही पण एग्झाम दिली तिने

त्यानंतरही त्यानं अनेकदा तिच्याशी असलेली मैत्री प्रत्येकवेळी निभावली तिच्या प्रत्येक अडचणीत तिला साथ दिली.

ती मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कधीच त्याला बोलू शकली नाही मनात असूनही "माझा धरलेला हात सोडू नकोस रे, मला हवायेस तू "

आज सात वर्षांनी ती शोधतेय त्याला परत, त्याच्या आठवणीने व्याकूळ होतेय …. तो दिवस डोळ्यासमोर तरळतोय सारखा. आजही डोळ्यात अश्रू आहे तिच्या तीन वर्षाच्या बाळाला घेऊन व्यसनी नवऱ्याचा अत्याचार सहन करतेय ती …
पण तिचा हात धरून आणून नवऱ्या समोर उभे करून त्याला ठसक्यात जाब विचारणारा कोणीच नाहीये हि जाणीव प्रखर झाली होती गेल्या काही दिवसात ….

गुगल वरून त्याचा नंबर शोधून काढला होता तिनं काल रात्री …. आणि आज सकाळ पासून तिचा तिच्या मनावर ताबाच उरलेला नाही.

तंद्री तुटली तिनं पुन्हा इकडे तिकडे पाहीलं चेहेऱ्यावरून हात फिरवला …. घड्याळ १ वाजल्याचं दाखवत होतं . दीड वाजता मिलिंद जेवायला येईल त्या आधी एकदा बोलून घेऊया का अक्षयशी ?… तिचं मन पुन्हा आगतिक झालं

तिनं मोबाइल उचलला नंबर फिरवला ….
समोरून आवाज आला त्याचा "हेलो…येस्स ?"

ती सकपकली जरा, काहीवेळ स्तब्ध …निरव शांतता इकडेही अन तिकडेही …

ती 'अं सॉरी… च च चूकून लागला हो फोन ……' रीसिवर ठेवून दिला तिनं

तिच्या हृदयाचे ठोके प्रचंड गतीने वाजत होते 'हेलो…येस्स.' त्याचा आवाज कानात सारखा वाजत होता.
आपला आवाज ओळखला असेल का त्यानं ? छे छे !!

दोनंच मिनिट

दोनंच मिनिटात तिचा फोन पुन्हा वाजू लागला …वाजत राहिला अखंड

भरल्या डोळ्यानं तिनं पाचवा फोन उचलला … तोच ओळखीचा आवाज

" थांब! फोन ठेवू नकोस, काय झालं …. tell me what happen ? कोणी काही बोललं का तुला ?"

त्याच्या या शब्दांनी तिचे डोळे अधिकच वाहू लागले….

ती नुसतीच मुसमुसत राहिली मग काहीही न बोलता … !!

- मयी

Wednesday, August 05, 2015

भेट

प्रिय,
तू म्हणालीस
सारखं सारखं नको भेटायला,
उगाच सवय लागायची…
पण भेटत जाऊ आपण
नाहीतर उगाच सवय लागायची,
न भेटण्याची …
~ मिलिंद जोशी