युगंधराचा पराभव
पाठशिवणीचा खेळ खेळून दमलेले बालगोपाळ
यमुनेकाठी डेरेदार वृक्षाखाली विसावले
नदीचे चमचमणारे प्रवाही पात्र
अलगद बाळकृष्णाला काळाच्या पुढे घेऊन गेले
शेवटी योगेश्वराची दृष्टी ती...
शतकांच्या, सहस्त्र्कांच्या आणि युगांच्या सीमा लांघून गेली...
आणि अचानक कुठेशी अडखळली...
...अरे हा कसला गोंगाट
हि कसली गर्दी?
आणि हे मधोमध कोण?
अरेच्चा, हे तर माझेच सवंगडी!
.... शेजारी हे कसले व्यासपीठ... नव्हे हा मंच,
हे कौरावांसारखे कोण? सोबत नर्तकांचा संच...
गिरीधर चक्रावला... क्षणभर कळेनासे झाले...
मग भगवंतानी दिव्यदृष्टी थोडी ताणली...
कालसंदर्भ लावून परिस्थिती जाणली...
.. हे तर माझेच अनुकरण...
आज गोकुळाष्टमी... म्हणजे माझेच स्मरण!
पण मी तर दही चोरून खायचो...
थोडा आई यशोदेला भ्यायचो..
हंडीपर्यंत पोचायला तीन थर पुरायचे
पोटभर खाऊनसुद्धा बोटभर उरायचे
... मात्र हे कसली लालसा? हि कुणाची हाव?
साहस कुणाचे... आणि कुणाचे आव?
हा तर याचा स्वार्थ... कुणाच्या प्रमोशनची वेळ,
माझ्या दिशाहीन गोपाळांच्या जीवाशी खेळ?!
... हा सुपरस्टार कधी चौथ्या थराला चढला?
तो अक्शन हिरो कधी पाचव्याहून खाली पडला?
मुरलीधर गलबलला... युगांपलीकडून एक आर्त आवाज आला...
"जे स्वत:च्या मनोधैर्याची उंची वाढवते ... ते साहस...,
जे स्वार्थांच्या हंड्यांची उंची वाढवते ... ते दु: साहस...
....कळेल तुम्हाला?"
... इतक्यात कसलासा जल्लोष झाला,
"वरचा कृष्ण" खाली आला...
एकच झिंग... सारे नाचू लागले...
कुणी मातीवर... कुणी चुकून... छातीवर...
केशवाची नजर चुकली... तो गोविंदा पुन्हा दिसला नाही...
नजरे आड गेला कसा, हरीचा विश्वास बसला नाही...
पुन्हा दिव्यदृष्टीला पुढे ढकलून...
मोहनाने त्या 'गोविंदाचे' घर गाठले... मात्र
आतल्या यशोदेचा टाहो ऐकून ईश्वराचे पाय
उंबरठ्याशी थिजले...
त्याच दिवशी गोकुळातले
आणखी काही दिवे विझले..
....
इथे पेंद्याने शून्यात नजर लावून बसलेल्या
बाळकृष्णाला हलवून विचारले,
"कन्हैय्या कुठे हरवला होतास?"
... पाणावलेल्या डोळ्यांनी भगवंत म्हणाले,
"हरवलो नव्हतो... मी "हरणार" आहे...
आपली खट्याळ खोड अक्षम्य गुन्हा ठरणार आहे.
.. चला गोरजवेळ झाली .. घरी जाऊ...
आणि उद्यापासून दही लोणी मागून खाऊ...
सौमित्र साळुंके
No comments:
Post a Comment