Tuesday, December 22, 2015

बारा मोटेची विहीर

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे"शेरी लिंब"नावाचे गाव आहे,
या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.
शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.
ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.
साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.
अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.
विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.
या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.
या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.
या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.
विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.
अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.
या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.
इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.
गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.
खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.
या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.
सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.
इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...!

No comments:

Post a Comment