महाशिवरात्री ची कथा
महाशिवरात्रीच्या दोन कथांपैकी एक कथा आपल्याला माहीत असल्याने त्याची पुनरुक्ती करीत नाही. ती कथा भारतीय साहित्यात मिथक झाली आहे. ती म्हणजे व्याधाची कथा. शिकारीच्या निमित्ताने आलेला व्याध तळ्याजवळच्या बेलाच्या झाडावर बसतो. खुडलेला बेल महादेवाच्या पिंडीवर आपोआप पडला, हा योगायोग. बाण सोडणाऱ्या व्याधाला हरीण दांपत्य म्हणते, ''आम्ही घरी जाऊन येतो. पाडसाचा निरोप घेतो.'' याला सत्याग्रहातली विधायक निर्भयता म्हणायचे. पाडसे व्याधापाशी येतात. त्याला विनंती करतात, ''आम्हाला मार.'' व्याधाचे मन दवते. तो धनुष्यबाणातली पापी वृत्ती मोडून काढतो. त्याच्या एकाग्र मनाला उपवासाचे श्रेय गवसते. जागरणाने मन पालटते. रात्रीतला अंधार अनायासे त्याच्याकडून तप करवून घेतो. शारीर भुकेतून मानस भूक, निसर्ग भूक, सांस्कृतिक भूक यांचा त्याला साक्षात्कार घडतो नि तो सगळ्यांच्या कल्याणासाठी झटतो. म्हणून तो शिवलोकात जातो.
जव्हार-डहाणूचा आदिवासी पट्टा महाशिवरात्रीस आपला उत्सव मानतो. ते शिवाला डोंगरदेव नि पृथ्वीला पार्वती मानतात. सातपुड्यात डोंगरदेवाची जत्रा अतिशय प्रसिद्ध आहे. या देवाला आपल्या गावाजवळच्या नदीच्या पाण्याची, तळ्यातल्या-विहिरीतल्या पाण्याची कावड वाहातात. 'हर हर महादेव'च्या उद्घोषात कावडी निघतात. साऱ्या आदिवासींना, वनवासींना महादेवाने वर दिला, ''मी सदैव पर्वतात, अरण्यात असेन, पार्वतीसह. तुमचा सांभाळ मी करीन.'' महाशिवरात्रीला आदिवासी नवी पालवी, नवा मोहर महादेवाला वाहातात. नवे कपडे घालून जत्रांना जातात. या आदिवासींमध्ये महादेवाच्या बाबतीत विविध कथा आढळतात. कथांतून निसर्ग आणि माणूस यांचे अतूट नाते सरसपणे व्यक्त होते. एक छान लोककथा मुद्दाम देतो. ही कथा पुन: पुन्हा वाचा. प्रत्येक वेळी ती नवा अर्थ देते.
शिवाला फळे आणायला पार्वतीने सांगितले. शिव अरण्यात गेला. शिवाच्या तेजाने फळे काही दिसेनात. शिवाने तिसरा डोळा उघडला. अरण्यात प्रकाशच प्रकाश झाला. वारा घाबरला. तो पळाला. झाडे हलायला लागली. फळे शंकराच्या समोर आली. शंकराने नंदीला फळे गोळा करायला सांगितले. नंदीने त्याप्रमाणे फळे पार्वतीच्या पुढ्यात ठेवली. पार्वती नंदीला म्हणाली, ''मी शिवाला फळे आणायला सांगितली. तू का आणलीस?'' नंदी म्हणाला, 'मला आज्ञा झाली. मी आणली.'' पार्वतीने विचारले, ''यातली महादेवाने कोणती फळे उचलली?'' नंदी चतुर. तो म्हणाला, ''मला देवाने आज्ञा केली. मी आणली.'' तेवढ्यात महादेव आले. व्याघ्रझोळीतून फळ काढले. पार्वतीच्या हातावर ठेवीत म्हणाले, ''हे घे.'' पार्वती खुलली. ''फळ आणायला एवढा वेळ लागला? कुणी भेटली होती की काय रस्त्यात?'' शिव हसला. म्हणाला, ''फळ मिळायला तप करावं लागतं. झाडांना त्रास न देता, त्यांच्या इच्छेनं फळ हातात पडायला सहनशीलता लागते. तुझ्या तपाचं हे फळ. अरण्याला त्रास न देता तप करायचं नि फळही त्याला विचारून खायचं.'' पार्वती म्हणाली, ''माझं चुकलं. मी फुलं उगाच तोडली.'' शिव म्हणाला, ''यापुढे लक्षात ठेव. पृथ्वीवर आपसूक फुलं पडली ती आपली. झाडावर असलेली ती अरण्याची.'' शिवाने पार्वतीला बेलफळ दिले. उमा बेलफळासह शिवात गुंगली.
या लोककथेने पर्यावरणाचा संदेश दिलाय. झाडांवरली फुले, फांद्या ताणून धसमुसळेपणे तोडायची नाहीत. काही आदिवासी स्त्रिया महाशिवरात्रीच्या दिवशी डोक्यात फुले खोवत नाहीत. मोकळ्या केसांनी शिवदर्शनास जातात. पांढरी फुले-बेल शिवाला वाहातात. शिव हा त्यांना आपला पालक वाटतो. संरक्षक वाटतो. काही आदिवासी अनवाणी दर्शनास येतात. जत्रेत मुलांना डमरू घेतात. कडेवर पोरांना घेऊन फेर धरून डोंगरदेवाची गाणी म्हणतात.
No comments:
Post a Comment