Tuesday, December 01, 2015

तू असतीस तर

तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे

बकुळिच्या पुष्पांपरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन्‌ रंगांनी भरले असते
क्षितिजावरले खिन्‍न रितेपण

पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदुश्यामल मखमल
अन्‌ शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसून मिष्किल

तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धूसर अंतर

मंगेश पाडगावकर

2 comments: